स्थानिक वृत्तअकलापूर केंद्राची क्रीडा स्पर्धेत बाजी; ३८१ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले!
🕒 प्रकाशित वेळ: 29 Nov 2026, 11:09 AM✍️ संपादकीय विभाग, सुराज्य मराठी
मवेशी केंद्र उपविजेता; ३९ आश्रमशाळांतील १,०९४ विद्यार्थ्यांचा सहभाग, विजेते खेळाडू धुळे विभागीय स्पर्धेत खेळणार
राजूर : आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्रीडा प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजूर यांच्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत अकलापूर केंद्राने घवघवीत यश संपादन करत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. ३८१ गुणांची कमाई करत अकलापूर केंद्राने विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली, तर ३०० गुणांसह मवेशी केंद्राने उपविजेतेपद मिळवले. तीन दिवस रंगलेल्या या क्रीडा स्पर्धांचा शनिवारी (दि. २८ नोव्हेंबर) उत्साहपूर्ण बक्षीस वितरण सोहळ्याने समारोप झाला.
राजूर प्रकल्पांतर्गत आयोजित या स्पर्धेत ३९ शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील तब्बल १ हजार ९४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. केळी रुम्हणवाडी, केळी कोतुळ, अकलापूर आणि मवेशी या चार केंद्रांतील २१ शासकीय व १८ अनुदानित आश्रमशाळांचे ५१० विद्यार्थी आणि ५८४ विद्यार्थिनी विविध क्रीडा प्रकारांत सहभागी झाले होते. तीन दिवस मैदानावर रंगलेल्या सांघिक व वैयक्तिक स्पर्धांमुळे क्रीडांगण उत्साहाने गजबजून गेले होते. क्रीडा स्पर्धांसोबत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनीही उपस्थितांची मने जिंकली.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना आमदार डॉ. किरण लहामटे, नाशिकचे सहाय्यक आयुक्त स्वप्निल साबळे आणि प्रकल्पाधिकारी देवकन्या बोकडे यांच्या हस्ते चषक व पदकांचे वितरण करण्यात आले.
यावेळी आमदार डॉ. किरण लहामटे यांनी ग्रामीण आणि आदिवासी भागातून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. आगामी वर्षापासून क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी मांडली. सहाय्यक आयुक्त स्वप्निल साबळे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करत पराभवातूनही महत्त्वाची शिकवण मिळत असल्याचे सांगितले. तर प्रकल्पाधिकारी देवकन्या बोकडे यांनी धुळे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत राजूर प्रकल्पातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून प्रकल्पाचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमात कुलप्रमुख जगन्नाथ जाधव यांनी स्पर्धेचा अहवाल सादर केला. यावेळी नाशिक व राजूरचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी, अधीक्षक, लेखाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, पंच, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यात आले, तर दीपक कालेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
अकलापूर केंद्राच्या खेळाडूंनी मिळवलेल्या घवघवीत यशामुळे केंद्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता धुळे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत राजूर प्रकल्पातील विजेते खेळाडू आपली चमक कशी दाखवतात, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.
सुराज्य मराठी प्रतिनिधी.विलास तुपे राजुर-अकोले